वर्धा, 1 जुलै : समृद्धी महामार्गावर शनिवारची मध्यरात्र काळरात्र ठरली आहे. नागपूरहून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली, ज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात बस दुभाजकाला जाऊन आदळली, यानंतर बसच्या डिझेलची टाकी फुटली आणि बसला आग लागली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्यांमध्ये अवंती पोहनीकर या वर्ध्याच्या इंजिनिअरचाही समावेश होता. पुण्याला जाण्यासाठी ती वर्ध्याहून निघाली, पण पुण्याला पोहोचलीच नाही. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळताच अवंती ठीक असेल ना ही काळजी तिच्या आईला सतावत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
अवंतीने सावंगीच्या अभियांत्रिकी महविद्यालयातून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करून करिअर घडविण्यासाठी पुणे गाठायचं असंच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अवंतीला मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं होतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवंती वर्ध्याहून पुण्याला निघाली.
अवंतीला पाहण्यासाठी मला तिकडे घेऊन चला असं म्हणत तिची आई टाहो फोडत होती. अवंतीच्या वडिलांचं तिच्या लहानपणीच निधन झालं, त्यानंतर आई प्रणिता यांनी अवंती आणि तिची बहिण मोनू यांना लहानाचं मोठं केलं. प्रणिता या मेघे विद्यापीठात काम करतात.
आईची प्रकृती बरी नसल्यामुळे अवंती परदेशामध्ये गेली नाही. मॉडेल म्हणूनही अवंतीने प्रसिद्धी मिळवल्याची माहिती आहे. नोकरीच्या निमित्ताने अवंती पुण्याला निघाली होती, पण वाटेतच काळाने तिच्यावर घाला घातला.