नाना शंकर शेट मुंबईचे आद्य शिल्पकार असून शासनाला त्यांचा पुरता विसर पडला आहे अशी खंत अध्यक्ष समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी यांनी व्यक्त करत आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाना शंकर शेट टर्मिनस नामांतरण न झाल्यास दैवज्ञ समाजाकडून प्रखर आंदोलनाचा इशारा दिला.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाना शंकर शेट टर्मिनस नामांतरण करण्याच्या मागणीने आता जोर धरला असून दैवज्ञ समाजाने आता त्याबाबाबत जहाल भूमिका घेतली आहे असे दैवज्ञ समाजाचे उपाध्यक्ष डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाच्या अनेक विविध स्तरांवरील बैठकांमध्ये सातत्याने फक्त आश्वासनच मिळत असल्याने दैवज्ञ समाजाने आता थेट केंद्रीय मंत्र्यांसोबत बैंठकांचा सिलसिला सुरु केला आहे. त्याच्या पाठपुरावासाठी दैवज्ञ समाजाचे शिष्टमंडळ आता थेट दिल्लीलाच ठीय्या मांडणार असून त्याबाबतच्या बैठकांचा सर्व तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर आज दैवज्ञ समाजाच्या शिष्टमंडळाने विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली.
नाना शंकर शेट टर्मिनस नामांतरण विषय संसदेच्या अधिवेशनात गाजणार असून त्याबाबत आता दैवज्ञ समाजाने केंद्रीय मंत्री आणि रेल्वेशी संबंधित विविध उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्या आहेत. आज दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने मुंबई मध्ये आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. त्यावेळी समाजाचे उपाध्यक्ष डॉ आनंद पेडणेकर, युवाप्रमुख विशाल कडणे, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, ज्येष्ठ व्यावसायिक विजय कडणे, गणेश कसवणकर उपस्थित होते. त्यावेळी संसदेच्या अधिवेशनादरम्यान सदरील नामांतरणाचा विषय मा. गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या दरबारी प्रकर्षाने लावून धरून लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आ. प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले. नामांतरणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून त्यासाठी दैवज्ञ समाजाच्या शिष्टमंडळासोबत रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे
यांच्या दालनात पुढील आठवड्यात बैठक आयोजित करून विषय मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ. प्रवीण दरेकर यांनी सांगितले. सदर बैठक आयोजित करण्यासाठी आ. प्रवीण दरेकर यांचे विश्वासू सहकारी दैवज्ञ ज्ञाती बांधव विशाल कडणे यांनी विशेष भूमिका बजावली.