प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थेट बेंगलुरुला, चांद्रयान 3 च्या यशाबद्दल इस्त्रोच्या वैज्ञानिकांची घेतली भेट
दक्षिण अफ्रिका आणि ग्रीसचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यावर,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थेट बेंगलुरुला पोहोचले. इस्रोमध्ये वैज्ञानिकानी त्यांचं स्वागत केलं तसंच चांद्रयान 3 ची प्रतिमा त्याना भेट दिली. पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिक आणि सर्व संबंधितांची भेट घेऊन त्यांना अभिवादन केलं तसंच त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी चांद्रयानाची प्रक्षेपण प्रक्रिया जाणून घेतली.
त्यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून जाहीर केला तसंच चांद्रयान 3 चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याचा क्षण अविस्मरणीय असून या यशानं भारताचा गौरव वाढला आहे. या यशामागे वैज्ञानिकांचं समर्पण, प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. विमानतळावर उतरताच पंतप्रधानांनी जय जवान जय किसान आणि जय विज्ञानच्या घोषात उपस्थितांचं स्वागत केलं.