मर्डरवाले कुलकर्णी म्हणजे २ तासांचा दिलखुलास हास्यदरबार
वैभव आणि भार्गवीच्या जोडीबरोबरच विकास चव्हाणचा दुबई डान्स व्हायरल
विशाल कडणे – मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे शहरांमध्ये आपल्या विनोदाच्या जोरावर धुमाकूळ घालत असलेले अष्टविनायक निर्मित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक म्हणजे २ तासांचा दिलखुलास हास्यदरबारच. नाटकामध्ये वैभव आणि भार्गवीसोबतच निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण यांनी अफलातून भूमिका निभावल्या आहेत. दुबई, अरेबिक डान्स आणि आपल्या बहिणीचे लग्न अशा अनेक प्रसंगांना विकास चव्हाण आपल्या अभिनय कौशल्याने परिपूर्ण न्याय देताना दिसतो. नाटक संपल्यावर अनेक कलाकार विकासच्या दुबई डान्सच्या तालावरच विकासाला भेटायला येताना दिसतात. विकासदेखील तितक्याच प्रेमाने नाटक संपल्यावर आपल्या कौतुकाचे स्वीकार करतो आणि प्रेक्षकांना दाद देतो. नाटकामध्ये वैभव मांगलेच्या गायन कौशल्याचे अनेक गुण आपल्याला दिसतात.
‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नाटक २४ नोव्हेंबरला रंगभूमीवर दाखल झाले आहे. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मध्ये धुमाकूळ घालत आहेत हे नक्की.
प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मजा आल्याचे हे दोघेही सांगतात.
अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. हे नाटक पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.