मुंबई : एखादा कार्यकर्ता आशीर्वाद मागायला जातो, तेव्हा तो आपल्या इष्ट देवतेच्या समोर उभा राहतो. आज मी माझ्या इष्ट देवतेसमोर उभा आहे, असे प्रतिपादन भाजपचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किरण शेलार यांनी केले आहे. मुंबई पदवीधरची जागा ही भाजपची आहे. ती आपण कुणाला तरी ठेवायला दिली होती. ती त्यांनी ढापली. आता ती पुन्हा मिळवायची आहे, असे आवाहनही किरण शेलार यांनी केले. दरम्यान, मुंबई ही कोणाची खासगी मालमत्ता नसून मुंबईकरांचीच आहे, हे स्पष्ट होईल असे सांगतानाच केवळ एका व्यक्तीला जिंकवण्यासाठी नाही, तर आपला गौरव मोठा करण्यासाठी, मुंबईला बदमाशांकडून वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच, मुंबईसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असून पायाभूत सुविधांपासून धोरणात्मक विकासापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला काम करायचे आहे, असेही किरण शेलार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मुंबईचा आजवर विकास केला, त्यात कोस्टल रोड, इन्फ्रास्ट्रक्चरचे काम असो, निरनिराळ्या इंडस्ट्रीड आणणे असो किंवा अर्थव्यवस्थेला अग्रणी नेण्यासाठी त्यांचे असलेले योगदान असो…. या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात पुन्हा होणे अपेक्षित आहे. आणि ते होण्यासाठी तुम्हा मुंबईकरांचे आशीर्वाद पाठीशी असणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला मुंबईतील प्रत्येक शिक्षित विद्यार्थाला उत्तम रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेत, असेही किरण शेलार म्हणाले. भाजप संकल्प मेळाव्यात बोलताना शेलार म्हणाले, मुंबईकरांना येत्या काळात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळावे, आरोग्य उत्तम राहण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. केवळ पर्यावरण मोहिम राबवून शहर ठीक होणार नसून कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त कसे करता येईल, यासाठी प्राधान्याने कार्य करेन, अशी ग्वाही किरण शेलार यांनी दिली. महाराष्ट्रच्या विधान परिषदेत मुंबईकरांचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न मांडायचे आहेत. ते केवळ मांडणारच नाही तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असतील तर प्रत्येक विषय सफलतापूर्वक पूर्ण करेन, असा विश्वासदेखील शेलार यांनी व्यक्त केला.
Related Articles
Check Also
Close